Wednesday, January 4, 2012 10:20:48 AM
बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'
वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!
कुठलंही काम, प्रॉजेक्ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.
दोन तत्त्वं :
"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात
Friday, December 30, 2011 9:55:15 AM
एका मुलाने आपल्या आईला लिहिलेलं हे पत्र आहे.
अशी मेल आपल्या आई-बाबांना वाचायला लागू नये.एवढंच.!
आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण ‘पिऊ’ नकोस.. !
आई,
खरं सांगतो. मी नाही प्यायलो.
मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो.
सोडा असलेलं..!
आई,
खूप आग्रह केला मित्रांनी.
म्हणाले पी रे. पी रे.
पण नाही प्यायलो मी.
सगळ्यांनी चिडवलं मला,
भरीस पाडलं.
पण मी नाहीच ग्लासला हात लावला.
तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. न पिण्याचं.!
आई,
कोणी काहीही म्हणो.
न पिता एन्जॉय करता येतं
हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं.
मला गरजच नाही वाटली नशेची.!
आई,
पार्टी संपत आली आहे आत्ता.
जो तो घराकडे निघालाय.
खूप पिऊन ‘टाईट’ झालेले
माझे मित्र
स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत.
मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय.
निघालोय. पूर्ण शुद्धीत..!
मी येईन घरी धडधाकट.
नशेत गाडी ठोकण्याचा,
काहीबाही होण्याचा प्रश्नच नाही
मी प्यालोच नाही.
तर बेभान होण्याचं काही कारणही नाही.
आई,
मी निघालो.
गाडी काढतच होतो बाहेर.
पण पाहतो तर काय
समोरून एक गाडी सुसाट
येताना दिसतेय.
माझ्या जवळ अगदी जवळ येतेय ती. माझ्या गाडीवर..आदळतेय..
आई,
मी पडलोय गाडीबाहोर..
काहीच कळत नाहीये.
अंगातून काहीतरी
कारंजं फुटल्यासारखं उडतंय.
कोणीतरी हवालदार ओरडतोय जोरजोरात.
दारू पिऊन बुंगाट गाडी चालवत होती ती पोरं.
त्यांच्या गाडीनं ठोकलं याला.
मरणार हे पोरगं हकनाक.
आई,.
मला वेदना होताहेत गं खूप.
तू जवळ असावीस असं वाटतंय.
मी. मी.? आई.
मला का ठोकलं गं त्यांनी.
रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मी.
जमलेत इथे सगळं जण.
डॉक्टर, पोलीस, .
ते डॉक्टर म्हणताहेत..
काही चान्सेस नाही,
संपलंय सारं.
काहीच उपाय नाही.
नाही वाचणार हा.
आई,
तुझी शपथ.
मी ‘प्यायलो’ नव्हतो गं.
त्या गाडीतली मुलं नशेत होती.
खूप प्यायली होती.
दारू पिऊन गाडी चालवत होती..
आई,
ती मुलंही माझ्याच बरोबर
त्या पार्टीत होती बहुतेक
फरक इतकाच..
की प्यायले ते आणि मरतोय मी.!
का पितात गं आई हे लोकं.?
सगळं आयुष्य नासवतात..
स्वत:चं.
आणि दुसर्यांचंही. !
आई,
मला आता असह्य वेदना होतायंत.
आतल्या आत काहीतरी चिरत, कापत जातंय.
आई,
ज्या मुलाने माझी ही अवस्था केली
तो शुद्धीत येतोय आता.
मी कळवळतोय आणि
तो फक्त पाहतोय. सुन्नपणे. !
आई,
माझ्यासारखंच त्यालाही कुणीतरी सांगायला हवं होतं.
दारू पिऊन गाडी चालवू नकोस.
त्यानं ते ऐकलं असतं तर
आज मी जिवंत राहिलो असतो गं.
आई,
मला आता श्वास लागायला लागलाय.
तुटायला लागलोय मी अख्खा. आतल्या आत.
पण
तू नाही रडायचंस माझ्यासाठी.
मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती.
तेव्हा तेव्हा होतीस तू माझ्या बरोबर.
माझ्यासाठी.!
पण मरताना मला फक्त
एक शेवटचा प्रश्न पडलाय.
जर मी दारू पिऊन गाडी चालवत नव्हतो तर मग मी का मरायंचं?
दुसर्याच्या चुकीची शिक्षा
मीच का भोगायची..?
आई. का लोक दारू पिऊन गाडी चालवतात गं.?
सौज्जन--ऑक्सिजन टीम
Wednesday, November 23, 2011 8:17:24 AM
महागाईच्या भस्मासुरात सामान्य जनता भाजून निघत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. सामान्य जनता काडी काडी गोळा करून आपला संसार रेटत आहे. मात्र, सरकार गॅस, डिझेल, पेट्रोल यांत वाढ करण्यात गुंतली आहे. त्यामुळे जनतेचे खिसे मात्र रिकामे होत आहेत. गॅसचे दर असेच वाढत राहिले, तर काही दिवसांनी स्वयंपाकाला गॅसऐवजी लाकूड वापरावे लागेल. लाकडांसाठी जंगले ओस पडू लागतील व या सर्वच गोष्टींचा एकत्रित परिणाम जागतिक तापमान वाढीवर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आऽ वासून उभ्या असलेल्या महागाईला वेळीच आवर घातलेला बरा, नाही तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
Tuesday, September 20, 2011 8:25:11 AM
सौज्जन-- महाराष्ट्र टाइम्स--मनीषा नित्सुरे - जोशी
नुकताच गणेशोत्सव पार पडला.आता वेध नवरात्रीचे . मग दसरा आणि त्यानंतर वीस दिवसात दिवाळी येतेच आहे . एकामागून एक रांगेत येणारे सण साजरे करण्याची प्रथा आपण अगदी न चुकता नेमाने पाळत आहोत याचंच केवढं कौतुक . त्यासाठी स्वत : ची पाठ थोपटून घ्यायला आम्ही मोकळे . पण त्याव्यतिरिक्तही अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे उत्सव विद्रूप होत चालले आहेत ...
गणेशोत्सव जवळ आला की उत्सवाची आखणी , सजावट , मिरवणुका , मंडप - डेकोरेटर्स , अकरा दिवसांतील कार्यक्रमांचे आयोजन , पैशाचा हिशेब अशा एक ना अनेक गोष्टी मोठ्या उत्साहाने आणि हौसेने केल्या जातात . पण त्याच उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात आम्ही अनेक चुका करून बसतो , क्वचित अजाणतेपणी पण बहुतांशी वेळा जाणतेपणी . उत्सव साजरा करताना आम्ही काय केले ? हे जरा आठवून पाहिले तर अनेक खटकणाऱ्या गोष्टी समोर येतात . आम्ही मोठमोठ्या आवाजात रेकॉर्ड्स लावल्या , मिरवणुकीत ट्रक भरून डीजेचे स्पीकर्स लावले . माणसाच्या श्रवण क्षमतेपेक्षा कित्येक पटीने अधिक आवाज असणाऱ्या स्पीकर्सच्या भिंती उभारल्या , मिरवणुकीसाठी पोलिसांनी मार्ग आखून दिलेले असतानाही त्याव्यतिरिक्त आमच्या गणपतीसाठी म्हणून आम्ही लहान - मोठे रस्ते , गल्ल्या सुद्धा ' स्वत : च्या हिंमतीवर ' बंद ठेवल्या ( वा रे , काय पण बहाद्दुरी !) आणि आमच्या मिरवणुका पुढे दामटवल्या . मुक्या प्राण्यांना वेठीस धरले आणि सर्वसामान्य लोकांना गृहीत धरले . वाहतुकीची कोंडी केली . हॉस्पिटल , मॅटर्निटी होम , शाळा असलेल्या परिसरातही सायलेन्ट झोनचे नियम पाळले नाहीत , रात्री दहा नंतरही स्पीकर्स सुरूच ठेवले , डीजेला विरोध करणाऱ्यांवर अरेरावी , प्रसंगी हाणामारी सुद्धा केली . ( एके ठिकाणी याच कारणास्तव एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले .) रस्त्यांच्या मधोमध स्टेज उभारून अकरा दिवस रस्ते बंद ठेवले , बॅनर्स तर एवढे लावले की अपघातांना आमंत्रणच दिले ( एके ठिकाणी बॅनरमध्ये अडकून गणपतीची मूर्ती पडली आणि भग्न पावली ), गरज नसलेल्या ठिकाणीही रोषणाई केली , दिवस - रात्र वाट्टेल तेवढी वीज उधळली , कित्येक किलो गुलाल उधळला , फटाके तर एवढे उडवले की अनंत चतुदर्शीच्या दिवशी हवेत धूर की धूराची हवा हेच कळत नव्हते . पर्यावरणाची तर ऐशी की तैशी . आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेतल्या , मूर्तीच्या उंचीबाबतचे नियमही बासनात गुंडाळून ठेवले . गणपतीचे विसर्जन समुद्रात , खाड्यांमध्ये , तलावांमध्येच केले . निर्माल्य इतस्त : फेकले , पोलिसांना सहकार्य करताना हात आखडता घेतला , नियमांची पायमल्ली केली , कायद्यांचे उल्लंघन केले , एकूण काय , तर उत्सव जेवढा विद्रूप करता आला तेवढा केला . नियमांच्या चौकटीत राहूनही उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करता येतो . पण अनेक ठिकाणी उलट घडताना दिसलं . मिरवणुकांनी तर ताळतंत्रच सोडले होते . नाच - गाण्यांनी मिरवणुका बीभत्स करणे आणि दारूने उत्सव बरबटवणे ही कुठली संस्कृती ? ही आपली संस्कृती नाही . शिस्त , नियम पाळून पारंपरिक पद्धतीने , पारंपरिक वाद्यांच्या स्वरात सण साजरा केला अशीही उदाहरणे आहेत . पण ती केवळ उदाहरणे न राहता तेच चित्र सार्वत्रिक दिसायला हवे होते , ते झाले नाही . बाप्पा बोलू लागला तर ...!' असे विषय निबंधासाठी दिले जायचे . आता बाप्पा काही बोलायच्या ऐवजी मंडपातून पळून जातील अशी स्थिती आम्ही निर्माण केली आणि तरीही उत्सव साजरा केला , परंपरा पाळली म्हणून आम्हीच आमची पाठ थोपटत आहोत .
मागे वळून कोण पाहणार ?
आम्ही सण साजरे का करतो , देवाची विटंबना करायला की भक्ती म्हणून ? हे आता ठरवायला हवे . समुद्र पोटात घेतलेले सगळे पुन्हा जमिनीवर आणून टाकतो . त्याला गणपतीच्या मूर्ती सुद्धा अपवाद नाहीत हे माहित असूनही आम्ही बाप्पाला त्याच समुद्रात ढकलले . दुसऱ्या दिवशी बाहेर आलेल्या आणि पाण्यात न विरघळलेल्या भग्न मूर्ती पाहायला आम्ही थोडेच जाणार आहोत . मग त्या मूर्तीचं काही का होईना , आम्हाला काय त्याचे ? आपण रीतसर (?) विसर्जन केले यातच आम्ही धन्यता मानली . विघटन न झालेल्या अवशेषांचा किनाऱ्यावर सडा पडतो आणि विसर्जनानंतर चार - आठ दिवसातच त्याचा कचरा होतो . हे आम्हाला माहीत नाही काय ?
ज्या लोकांनी यावर्षी घरात किंवा मोकळ्या परिसरात कृत्रिम हौद तयार करून शंभर टक्के मातीच्या मूर्ती त्यात विसर्जित केल्या त्यांचे खरेच कौतुक करावेसे वाटते . त्याही पुढे जाऊन काही घरांत चांदीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते आणि विसर्जन म्हणून त्या मूर्तीला थोडावेळ बादलीत ठेऊन नंतर पुसून , स्वच्छ करून पुन्हा जागेवर ठेऊन देण्याचा पायंडा ज्या कुटुंबियांनी घातला त्यांचे विशेष कौतुक .
दुर्दैव असे की इथे असलेली मराठी माणसं सण साजरे करण्यामागची आपली मूळ कल्पना विसरून भलत्याच्या पाठी जात आहेत . दुर्दैव असे की असे करणे चुकीचे आहे हे माहित असूनही , त्या गोष्टींचे दुष्परिणाम माहित असूनही आम्ही त्याच ' फॉलो ' केल्या .... आंधळेपणाने . म्हणूनच वर उल्लेखलेल्या सगळ्या गोष्टी या अक्षम्य गुन्हे ठरतात . कारण अजाणतेपणाने नव्हे तर जाणून - बूजून आम्ही आमचा उत्सव कुरूप केला , विद्रूप केला आणि तरीही जर आम्हाला परंपरा पाळल्याचा अभिमान वाटणार असेल तर आमच्या सारखे कपाळकरंटे आम्हीच . अनेक चुकीच्या गोष्टी ' गणेशोत्सवाच्या नावाखाली ' दुर्दैवाने कायमस्वरूपी होऊ लागल्या आहेत आणि इथेच धोका आहे . यामुळे जे करतोय तेच योग्य आहे , असे समजले जाण्याची भीती आहे . नियम किंवा कायदे हे समाज हिताच्या दृष्टीने केले जातात . ते पाळण्याला प्राधान्य देणं हे सार्वजनिक उत्सवांनी आपलं कर्तव्य मानलं पाहिजे . कायद्यांचे उल्लंघन करण्याची परवानगी कुठलाही सण देत नाही . ' ते करतात मग आम्ही का नाही ?' हा बालिश प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा ' चांगल्या सवयींची सुरूवात आम्ही आमच्यापासून करणार आहोत ' ही प्रगल्भता दाखवण्याची वेळ आली आहे .
गणेशोत्सव , नवरात्रासारख्या सार्वजनिक उत्सवांच्या काळात आपली बुद्धी शाबूत ठेवणे आणि शिस्त व नियम पाळणे या गोष्टी सणांचे पावित्र्य जपण्याइतक्याच महत्त्वाच्या आहेत . आगामी सण - उत्सव साजरे करताना तरी या गोष्टींचा विचार व्हायला हवा .
Friday, August 12, 2011 5:59:39 AM
ईमेल वर आलेल एक कथानक मी येथे देत आहे.
रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो. शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................
१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.
अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................
लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, ३/४ स्विच झले, पॅकेज वाढले.मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला "पन्या / पंक्या" होतो आता "पी. एम." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे. एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही.
मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.
घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “जाउ दे त्याला निवांत” महणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार………..सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....
मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल आई-आप्पा कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही,
मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही.
लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण; “च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते” असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.
गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण तुम्ही सुधा दु:खी व्हाल, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.
अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.
मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.
काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते …..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात..आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.
आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत, कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का? का मीच त्या वाटेला जात नाही. विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीन ची हॉट कॉफी मारुन पार्किंग मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो.
पण आता ठरवले आहे……काही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी जाउ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला अडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून?
बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत:चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालो..........गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय.
कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.
बसस्स.......आता ...ठरवले आहे…आणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जातो, ए हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे, अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा "घुमाई देवी" च्या यात्रेला गावी जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे?
मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मला……पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे.
एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही “स्क्वेअरफूट” घेण्यासाठी धडपडत आहोत काय?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत काय?
आपलाच... गर्दीत हरवलेला एक मित्र,
1 2 3 4 5 ... 39 Next »