माझे ’आलु पराठे’
Monday, 18. May 2009, 16:06:03
प्रभासचे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग प्रभसच्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच.
थोड्यावेळानी मात्र आम्हाला सगळ्यांनाच भुक लागली. प्रभास दिवसभर कॉलेजला असणार म्हणुन आईनं काहीच करुन ठेवलेलं नव्हतं घरात.त्यामुळं तर आमची अजुनच जास्ती पंचाईत झाली. काय करावं काही सुचत नव्हतं. मध्येच माझ्या डोक्यात आलं काहीतरी.. मी म्हटल,"प्रभास, घरात पोळीचं पीठ आणि बटाटे आहेत का?"
प्रभास :- "हो, आहेत."
मी:- "काढ कणिक बाहेर, मी आलु पराठे बनवतो."
प्रभास :- "येतात का तुला नक्की बनवता?"
मी :- "हो मग!"
प्रभास:- म्हटलं, हा बाप्या एवढं आत्मविश्वासानी सांगतोय तर येत असतील.
मी कणिक भिजवली, ती मळली, त्याचबरोबर बटाटे उकडायला ठेवले. बटाटे उकडुन तयार होतायेत तोवर, मी पराठे ’थापायला’ सुरुवात केली. ती ओली कणिक... पोळपाटाला चिटकत होती तशीच.. बघावं तर मी कणकेचा सगळा डब्बाच रिकामा केलेला! पराठे बनवतांना वापरायला म्हणुन कोरडी कणिकच उरली नव्हती!!
ते बटाटे सुद्धा या मी पुर्ण उकडु दिले नाहीत. तसेच बाहेर काढले, त्यांचे काप केले आणि अक्षरशः हातानी ’पेरले’ त्या कच्च्या पराठ्यांमध्ये!
बाप रे!!!
डोंबल्याचे ’आलु पराठे’.. भरपुर शिव्या पडल्या मला.. नाही तर काय?
तरी नशिब, पंकज आमच्या सोबत होता. आणि नशिब अजुनच बलवत्तर की त्याला खिचडी अगदी व्यवस्थीत (आणि हुकमीपणे) करता येत होती.
शेवटी पंकजनी तांदळाची खिचडी लावली, आणि आम्ही सगळे त्यावर तुटुन पडलो..!
पराठे होतेच सोबत.. लोणच्यासोबत खायला..














