नको तो दिवस
Sunday, 15. February 2009, 13:35:49
मी आज एका दहावीच्या मुलाच मनोगत देत आहे....
आणि हे अस आपल्या सगळ्याना पण वाटत असत.....
'' आई लवकर माझा डबा दे, शाळेला उशीर होतोय. अगं मॅडम ओरडतील.'' ''माझं मराठीचं पुस्तक कुठे आहे?'' ''शी! युनिफॉर्मला इस्त्री पण केलेली नाहीये.'
' असं म्हणतात म्हणता तिकडे शाळेची घंटा वाजते सुद्धा. घन घन घन घन.....
हो? पण हे सगळं आता आहे! कारण हे वर्ष आहे दहावीचं!, शालेय जीवन संपण्याचं! मनाला कितीही समजावलं तरी शाळा सोडून जाण्याचं वाईट हे वाटतंच. शाळेतले सगळे शिक्षक-शिक्षिका, त्यांचं वेळोवेळी मिळणारं प्रोत्साहन. चूक झाल्यास मिळणारा ओरडा. मधल्या सुट्टीत शिपायांबरोबर चालणारी थट्टा-मस्करी. क्वचितच हवाहवासा वाटणारा ऑफ पिरियड. सगळं काही थांबणार आहे. याचं दु:ख होतंय. असं वाटतं की, पुन्हा ३ री-४ थी मध्ये जावं आणि दहावीपर्यंत यावं. झालेल्या चुका सुधाराव्यात. गमावलेल्या संधी पुन्हा मिळवाव्यात. मग अचानक जाणीव होते की, हे आता शक्य नाही.
आजपर्यंत या शाळेने आम्हाला बरंच काही दिलं. विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन लोकांसमोर बोलण्याचं धैर्य दिलं. अ आ इ ई गिरवायला याच शाळेने शिकवलंय. आता तर काय कम्प्युटर आलाय. त्यामुळे त्याचं ज्ञानही या शाळेने दिलं. इथे शिकलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला शिदोरी म्हणून नक्कीच उपयोगी पडेल. या ज्ञानाच्या बळावरच आम्ही आमचे ध्येय प्राप्त करणार आहोत. शाळा सोडल्याशिवाय आयुष्यात पुढे जाता येत नाही. आपल्या आठवणीत शाळा राहणारंच पण शाळेच्या आठवणीतही आपण कायम रहावं, असं नाव मला कमवायचंय. लवकरच आम्हाला नको असणारा निरोप समारंभ होईल. हा दिवस नकोसा वाटत असला तरी कुठल्याच दहावीच्या विद्यार्थ्याला तो चुकवता आलेला नाही. आम्हीही या समारंभाला जाऊ. पण तरीही राहून राहून वाटतंय, नको तो दिवस..!














How to use Quote function: