दंगामस्ती.. अजुन एक!
Tuesday, 5. May 2009, 03:28:06
याच फ्लॅशबॅकमधला अजुन एक किस्सा...
बि.सि.एस. फर्स्ट इयरचा हा किस्सा. आम्ही - म्हणजे मी, महेश आणि प्रभास - लेक्चर्सना कधी बसायचोच नाही. म्हणजे तसं अधुन-मधुन तोंडं दाखवुन (आणि बघुन) जायचो, पण त्याचं प्रमाण फारच कमी होतं. आम्ही आपले कधी बोट क्लबवर, कधी कॉलेज कॅंटीन, बऱ्याचदा ’बाबा’-’शिबा’वर (ही आमच्या कॉलेजजवळची दोन छोटी, पण भरपुर पब्लिक असणारी हॉटेलं) असं कुठे-ना-कुठे पडीक असायचो. पण आमचा मित्र बंडु मात्र एकदम सिंसीयर कार्टं. झटुन सगळे लेक्चर्स करणार. सगळ्या लेक्चर्सना व्यवस्थीत नोट्स काढणार. मग आम्ही काय करायचो, रोज कॉलेज सुटलं की बंडुला गाठायचो. त्याच्याकडुन आम्हाला सगळ्या बातम्या कळायच्या.
"तुम्ही लटकलात रे आता.. उद्या सर करणार तुमची चंपी.."
"तुम्ही मेले, सरांनी प्रॅक्टीकलला बसु देणार नाही म्हणुन सांगितलंय.."
"अरे सरप्राईज टेस्ट सांगितलीये मॅडमनी.."
"अटेंडन्स लावणार आहेत बोर्डवर.."
ही आणि अशी अनेक वाक्य असायची त्याची. नाही म्हटलं तरी आम्ही थोडेफार तरी टरकायचोच.
पण ते घाबरणं तेवढ्यापुरतंच.. परत आमचं पहिले पाढे पंचावन्न!
असं करता-करता परिक्षा जवळ आल्या. मग जरा आमचं (अगाध) ज्ञान थोडं(?) तोकडं पडु लागलं आणि आम्ही बंडु महाराजांनाच साकडं घातलं "आम्हाला मॅथ्स शिकवा" म्हणुन.
महाराज लगेच तय्यार!! तरी सुद्धा त्यांची थोडी भाषणबाजी ऐकावी लागलीच!
"तरी तुम्हाला सांगत होतो, लेक्चर करा म्हणुन.. पण ऐकताय कुठं तुम्ही माझं?"
मी आणि महेश मग कॉलेजच्या लायब्ररीत बसुन बंडु सरांकडुन शिकवणी घेऊ लागलो. प्रभास मात्र घरीच बसुन अभ्यास करायचा.
आम्हाला मॅथेमॅटिक्सचे तीन पेपर्स होते - एम.१, एम.२ आणि एम.३ असे. आम्ही या तीनही पेपर्सचा अभ्यास या महाशयांच्या ’गाईड्न्स’खाली गिरवायला सुरुवात केली.
कधी बंडु आमची उणी-दुणी काढायचा.. तर कधी आम्ही त्याची..
आणि परिक्षा उजाडलीच! पेपर्स दिले..
प्रत्येक पेपर नंतर आम्ही चौघं उत्तरं टॅली करुन बघायचो आणि आमचे डोळे फिरायचेच.. प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच उत्तर असायचं..!
त्याच धास्तीत आम्ही रिझल्टला सामोरे गेलो. आणि..
पेपर्सपेक्षा तर निकालच जास्ती धक्कादायक निघाला की!!
बंडु सोबत मी आणि प्रभास - असे आम्ही तिघंही ’निकालात निघालो’.. महेश तेवढा वाचला.
मी एम.१ मध्ये नापास..
बंडु एम.३ मध्ये नापास..
प्रभास पण एम.३ मध्ये नापास..
आणि बंडुचा परमप्रीय मित्र अमोल.. या तीनही पेपर्समध्ये नापास!!
मला तो लॅंब्डा नडला.. प्रभासचं तसंही मॅथ्सशी आधीच वाकडं असल्यानं एम.३ राहिला त्याचा.. पण बंडुचं काय झालं काय माहीत? त्याचं तर गणित चांगलं होतं..
नंतर आम्ही कसे-बसे हे विषय सोडवलेच.. अगदी ’क्रिटीकल’वर सोडवले.. पण हुश्श..!
आता मात्र हे सगळं आठवलं की फट्कन हसु येतं..














Anonymous # 26. May 2009, 10:11
Zakkas Kissa!!!!!
Maths Ahech tas tyala tumhi bichare tari kay karnar..:P..:(