Friday, 3. July 2009, 13:33:09
ट्विटर, कवडसा, आनंद, गप्पा
...
नमस्कार!
मला माहीत आहे तुम्ही मला जेव्हा-जेव्हा जमेल तेव्हा-तेव्हा, आणि जेव्हा-जेव्हा नविन इथं लिखाण असेल तेव्हा-तेव्हा वाचताय.
तुमच्यापैकी काही जणांचा हा नेहेमीचा रस्ताच झालेला आहे, याची मला खात्रीशीर माहिती आहे.
जेव्हा-जेव्हा हा प्रभास निवांत असतो, तेव्हा तेव्हा तो लगेच लिहितोच इथं काही ना काही. पण आजकाल बऱ्याचवेळा त्याला वेळच मिळेनासा झालाय. काय करणार? कामाला पहिलं प्राधान्य द्यायलाच पाहिजे! नाही का? आजकाल तो बराचसा विसराळु सुद्धा झालाय तसा.. बऱ्याचवेळा या महाशयांना काहीतरी सुचतं इथं लिहायला.. अगदी पॅराग्राफ भरुन नाही, छोटी-छोटी वाक्यं.. पण मग लगेचच लॅपटॉप उघडुन, या साईटवर येऊन लॉग-इन करे पर्यंत राजे विसरलेलेच असतात आपण काय लिहीणार होतो ते!! आजकाल बरेचशे दिवस विना-लिखाणाचे जाताहेत याचं खरं कारण तेच आहे. पण करणार काय? कित्ती प्रयत्न केले या बाप्यानी लक्षात ठेवायचे, पण छे!!!! कोणताही उपाय चालेना.
पण झालं काय, आषाढी एकादशीच्या या शुभ दिनी, देवा पांडुरंगानं प्रभासला योग्य ती बुद्धी दिली!! (अहो आश्चर्यम!) आणि याच बुद्धीचा अगदी अप्रतिम वापर करुन प्रभासला ही आयडिया सुचली.
त्यानं माझंही खातं उघडलंय ’ट्विटर’वर. आता त्याला जे-जे छोटंसं काही-बाही सुचेल, ते तो चटकन तिथं लिहीत जाणार आहे. आणि मोठं जे काही असेल ते इथं!!! इथं चालणारी प्रभासची टकळी तिथं सुद्धा चालणारच आहे. पण शॉर्ट ऍन्ड स्वीट. 
तुम्ही सुद्धा आहात का हो ट्विटर वर? असलात तर मला नक्की भेटा बरं! काय म्हणतात ते.. हा! Follow Me!
आणि जर, बाय चान्स, तुम्ही नसलात ट्विटरवर, तर माझं आग्रहाचं आमंत्रण आहे, माझा हट्टच आहे तुमच्याजवळ असं समजा!
आणि लगेचच ट्विटरवर आपलं सुद्धा खातं उघडुन मला भेटा. आत्ता पर्यंत तुम्ही मला वाचत आला आहात, एका अर्थानं मला Follow करत आला आहात, आता मला सुद्धा Follow करु द्या तुम्हाला.
चला तर मग, चांगल्या कामाला उशीर कशाला?? चटकन इथं क्लिका आणि या माझ्या अजुन एका घरी! मी तुमची वाट पाहतोय.
तुमचाच,
कवडसा
Thursday, 2. July 2009, 01:44:17
पाऊस
भास आहे सर्व काही
मॉन्सुनला अर्थ नाही
तो म्हणे सर्वत्र आहे
पडत नाही एकदाही
Wednesday, 24. June 2009, 16:05:36
गप्पा, अनुभव
या आपल्या निसर्गात कुठलीतरी अद्भुत अशी शक्ती असलीच पाहिजे, जी इतर प्राणीमात्रांना सहज साध्य आहे, आणि आपणा मानवाला मात्र ती एकतर अज्ञात आहे किंवा अवगतच नाहीये..
या मताला मी येऊन पोचण्यासारखी घटनाच घडली ना तशी!!
मगाशी, जेवण करत असतांना एक मुंगी ताटाजवळ आली. तिला टिचकीनी बाजुला करण्याच्या नादात चिरडलीच गेली ती एका बाजुनी!
आता ती मुंगी केवढी, माझा हात केवढा..
म्हणजे, तिच्या जिवाचा विचार केला तर हे चिरडलं जाणं अगदी जिवानिशी मारणारंच होतं.
तडफडलीच ती थोडा वेळ.. हो.. पण अगदी थोडाच वेळ! अक्षरशः घड्याळी एका मिनीटात ती परत व्यवस्थीत झाली!!
आता आपल्यालाच बघा. अगदी नुसते कुठे पडलो जोरात, तरी एक-दोन दिवस लंगडत चालायला होतं..
मग तिच्या मानानी अगदी प्राणघातक असलेलं ते चिरडणं कसं काय सहन केलं गेलं असेल तिच्याच्यानी???
आणि अगदी दुसऱ्या मिनिटाला परत पुर्ववत चालायला लागुन पुढे कामाला निघुन सुद्धा जाणं???????????
खरंच अनाकलनीय आहे हे.. एवढास्सा जीव तो. पण किती पटकन रिकव्हर केलं तिनं.. अगदी जादु केल्यासारखंच!
खरंच या आपल्या निसर्गात कुठलीतरी अद्भुत अशी शक्ती आहेच, जी इतर प्राणीमात्रांना सहज साध्य आहे, आणि आपणा मानवाला मात्र ती एकतर अज्ञात आहे किंवा अवगतच नाहीये..
Showing posts 1 -
4 of 221.