Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

मोर्चा - संदिप खरेंची कविता

, , ,

मी संदिप खरेंचा फॅन आहे. त्यांच्या बऱ्याच कविता मला आवडतात. त्यांतलीच एक "मोर्चा".
आयुष्यात कोणतीच गोष्ट न करणारा, काय योग्य काय अयोग्य, काय चांगले काय वाईट हे काहीही न बघणारा आणि त्यावर कोणतेच भाष्य, कृती न करणारा माणुस या कवितेत रेखाटला गेलाय. या कवितेत वापरलेली उदाहरणं, उपमा इतक्या चपखल आहेत की तोंडातुन "अरे व्वा!" बाहेर पडल्याशिवाय राहत नाही.


मी मोर्चा नेला नाही
मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा
कधी नोंदवलेला नाही ॥धृ॥

भोवताली संगर चाले
तो विस्फारुन बघतांना
कोणी पोटातुन चिडतांना
कोणी रक्ताळुन लढतांना
मी दगड होऊनी थिजलो
रस्त्याच्या बाजुस जेव्हा
तो मारायाला देखील
मज कुणी उचलले नाही ॥१॥

नेमस्त झाड मी आहे
मुळं फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो
थंडीत झाडली पाने
पण पोटातुन कुठलीही
खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही
कधी गरुड बैसला नाही ॥२॥

धुतलेला एकच सदरा
तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजुन रुळते
अदृष्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो
मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या
कधी दंगा केला नाही ॥३॥

मज जन्म फळाचा मिळता
मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी
तर भेंडी झालो असतो
मज चिरता-चिरता कोणी
रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही
आंबा ही झालो नाही ॥४॥

दंगा-मस्ती - क्रिकेटची...

, , , ...

काल भरतच्या रुमवर तो, धन्या आणि मी असं तिघं क्रिकेट खेळलो. :smile: कोणाचा तरी प्रोजेक्ट रिपोर्ट होता, ती आमची बॅट. आणि कागदाचा बोळा म्हणजे आमचा बॉल.. आणि आमचं क्रिकेट सुरु!! बऱ्याच दिवसांनी असं ’इन-डोअर क्रिकेट’ खेळलो! दंगामस्ती करत खेळलो आणि मी, भरत आणि धन्या - आम्ही तिघंही फ्लॅशबॅकमध्ये गेलो.

आम्ही जेव्हा बि.सी.एस.च्या तिसऱ्या वर्षाला होतो, तेव्हा टिळे सरांच्या क्लासवर दुपारी असंच क्रिकेट खेळायचो. बऱ्याचदा कॉलेजला दांडी मारलेली असायची. तिथुन निघुन थेट सरांच्या क्लासवरच टपकायचो आम्ही. मग कोणाचं तरी ’रायटींग पॅड’ आमचं बॅट बनायचं आणि सरांची बोर्ड पुसायची कापडं आमचा चेंडु तयार करायचे. सरांनी क्लास सांभाळायला ठेवलेला ललितसुद्धा असायचा आमच्या सोबत. नुसता धांगडधींगा चालायचा आमचा.

क्लासमध्ये प्रोग्रामींगची प्रॅक्टीस करण्यासाठी एक स्वतंत्र लॅब होती. तेच आमचं मैदान असायचं. कधी कधी काही पोरी तिथं प्रोग्राम करत बसलेल्या असायच्या.. पण आम्हाला कसलीच पर्वा नसायची.. कोणी तक्रार करेल वगैरे काही भितीच नाही ना!

सर यायच्या वेळी मात्र आम्ही सगळं परत जागच्या-जागी ठेवुन निमुटपणे प्रोग्राम करतोय असं दाखवायचो. टिळे सरांना घाबरायचो आम्ही सगळेच.

एकदा काय झालं, आम्ही असंच क्रिकेट खेळत होतो. कोण बॅटींग करत होतं आठवत नाही आता. एक मुलगी लॅब मध्ये प्रोग्राम करत बसली होती. शॉट मारतांना बॅट्समनच्या हातुन पॅड सटकलाच, आणि भिरभिरत गेला थेट ती पोरगी बसलेली त्या कॉम्प्युटरवरच! मुलगीतर वाचलीच थोडक्यात, कारण अन्यथा डोकं फुटलंच असतं तीचं, पण पॅड नेमके मॉनिटरच्या कोपऱ्यावर बसले. जरा अजुन अलिकडे बसले असते तर स्क्रीनचा नक्कीच चक्काचूर झाला असता! आणि मग हे क्रिकेट आम्हाला चांगलंच महागात पडलं असतं... पण वाचलो!

अगदी इंटरनल परिक्षेच्यावेळी सुद्धा आम्ही हे क्रिकेटायन सोडले नाही. पेपरच्या आधी आम्ही सगळे क्लासवर जमायचो. बाकीचे लोक तिथं अभ्यास करत बसलेले असायचे आणि आम्ही मात्र क्रिकेट खेळत असायचो. खुप एन्जॉय केलंय आम्ही हे असं ’इन-डोअर’ क्रिकेट.

तसं आम्ही ’आऊट-डोअर’ क्रिकेट सुद्धा भरपुर खेळलो आहोत, आणि त्याचे सुद्धा भरपुर मजेशीर किस्से आहेत.. पण ते नंतर सांगेन, पण नक्की सांगेन. :smile:

तुमच्याकडे, तुमच्या आसपास जुनी सायकल आहे का?

, , ,

मुंबई-पुण्यासारख्या शहरांत भंगारात पडून असलेल्या, जुन्या, मोडक्या सायकली गावातल्या मुलांची पायपीट वाचवू शकतात. त्या संदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी. कोणीही सहभागी होऊ शकतो असा हा प्रकल्प अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा प्रपंच.


इथे होतं भंगाराचं सोनं
(१७ फेब्रुवारी २००९)
- सुनील घुमे

जागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.

गाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.

त्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.

विक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ६ ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची २ ते ७ किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं ६ रुपये भाडं परवडत नाही.

आदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी पाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.

मुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, ई-मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.

एका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.

केवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान १ लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.

तुम्हीही उचला खारीचा वाटा
भंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject@gmail.com या पत्त्यावर इ-मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.



हा संदेश मला ई-मेल मधुन आलेला आहे. तो तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणुन इथं देत आहे. 
- प्रभास