Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

जरि तुझिया सामर्थ्यानें...

जरि तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही!
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाहीं!!

शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करितिल सारे मुजरे!
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें!!

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें!
अन् स्वत:स विसरुन वारा
जोडील रेशमी नातें!!

कुरवाळित येतिल मजला
श्रावणांतल्या जळधारा!
सळसळून भिजलीं पानें
मज करितिल सजल इषारा!!

रे तुझियां सामर्थ्यानें
मीं कसें मला विसरावें?
अन् रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें?

येशिल का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा!
उधळित स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा?

शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होऊनि ये तूं!
कधिं भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू!!

तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यांत मज विसरावें!
तु हसत मला फुलवावें
मीं नकळत आणि फुलावें!!

पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरि दाही!
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाहीं!!

:- मंगेश पाडगांवकर

जगत मी आलो असा की...

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

: - सुरेश भट

किती हळूवारपणे जपतात

किती हळूवारपणे जपतात
माणसं आपापल्या काळजातील कोपरे........

मनाचे......
...........घराचे
दाराचे..........

तीच्या - त्याच्या आठवणींचे..
......उडून गेलेल्या दिवसांचे..

अन्..
हातातून निसटून......
.........गेलेल्या आयुष्याचेही..