Monday, 17. November 2008, 03:40:35
गप्पा, गारवा, प्रभास
गुलाबी मॉर्निंग!
शनिवार रात्रीपासुन थंडीनी परत जरा अस्तित्व दाखवायला सुरुवात केलीये! शनिवारी रात्रीतर बरयापैकी थंडी होती. म्हणजे पंखा बंद करायला लागेल एवढी तर नक्कीच होती हो. आणि काल... कालचं तर काही विचारुच नका! माझ्या घराकडच्या भागात तर सकाळ पासुनच गार हवा वाहत होती. त्यातुन मी राहतो सहाव्या मजल्यावर. आणि आजुबाजुला तेवढया उंच इमारती नसल्यानं वाऱ्याला तर काहीच प्रॉब्लेम नव्हता मुक्त संचार करायला. शेवटी मला दारं-खिडक्या बंद कराव्या लागल्या. (गारवा तर होताच, पण वाऱ्यामुळं टेबलवरच्या वस्तु पण फॉलायला लागल्या.)
काल सकाळपासुन हवा सुद्धा तशी ढगाळच आहे. कात्रज-सिंहगड भागातल्या (आणि या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या) डोंगरांवर तर चक्क ढग उतरले होते! अगदी सकाळपासुन ते संपुर्ण दिवसभर!! मस्त मजा वाटत होती ते बघायला. मी बऱ्याच वेळ गॅलरीमधे उभा राहुन ते बघत होतो.

असं मस्त पांढरी मऊमऊ चादर परसल्यासारखे दिसत होते डोंगर सगळे.. ती लांबवर दिसणारी एन.डि.ए.ची इमारत तर दिसतच नव्हती काल.. एरवी एन.डि.ए. गेट ते चांदणी चौकच्या थोड्या अलीकडचा भाग व्यवस्थीत दिसतो गॅलरीमधुन, पण तोही दिसत नव्हता. दुसऱ्या गॅलरीतुन सिंहगड इंस्टीट्युट दिसते, तीपण नजरेस पडत नव्हती. (शेवटी उभं राहुन कंटाळा आला म्हणुन मग आत आलो परत.)
संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो तेव्हापण गारवा जाणवतच होता. अगदी स्वेटर घालावा लागेल एवढा नाही, पण होताच. म्हणुन मग मुद्दामच कॅनॉल कडच्या रस्त्याला गेलो होतो. थोडावेळ तिकडं भटकलो आणि मग बायपास-हायवे कडे मोर्चा वळवला.

थोडावेळ तिकडं भटकलो आणि घरी परतलो.
खरंतर ढगाळ हवा असली की मला क्रिकेट खेळावसं वाटतं.

पण माझा कोणताच मित्र आमच्या भागात रहात नाही, त्यामुळं नाही खेळता आलं.

(सिंगल-प्लेअर क्रिकेट माहीत आहे का हो कोणाला? ते पुस्तकाचं नाही, दुसरं कुठलं तरी...)
बास्स! बाकी रविवार तर व्यवस्थीत पार पडला. सकाळी थोडावेळ लॅटपॉटवर खाटखाट-खुटखुट करत होतो, मग जरा वडिलांसोबत बाहेर जाऊन आलो. आणि परत खाटखाट-खुटखुट..
Thursday, 16. October 2008, 03:34:23
मत, गप्पा, हिवाळा, गारवा
...
आज-काल रोजंच धायरी परिसरात धुकं पडतंय. धायरी ओलांडुन पुढं गेलं की मग शहरी भाग संपतोच ना! छान-छान गावांचा एरिया सुरु होतो. आजुबाजुला मस्त डोंगर आहेत, थोडं अजुन पुढं गेलं की खडकवासला धरण आहे. त्यामुळे थंडी जास्ती असायला भरपुर पुरेपुर वाव आहे.
काल रात्रीपासुन तर गारवा जास्तीच वाढलाय. किमान तापमान १५.४ डिग्री सेंटीग्रेड असं नोंदलं गेलंय.

तसं भर दिवसा ’ऑक्टोबर हिट’चा कडाका जाणवतच असतो बाहेर पडलं की.. पण आता रात्रीमधे थंडीचा कडाका जाणवायला लागलाय. अगदी खुप थंडी नसली तरी चाहुल मात्र नक्कीच लागलीये. माझ्या मते दिवाळीनंतर जोर धरेल थंडी. आत्ताच स्वेटर, जॅकेट काढुन ठेवलेलं बरं! नाही का?
गेली काही वर्ष, तसा प्रत्येकच ॠतु ’एक्सट्रीम’ होतोय असं नाही वाटत का हो तुम्हाला? म्हणजे बघा ना, उन्हाळ्यात तापमान पार ४०च्या वर पोचतं. पावसाळ्यात पाऊस भरपुर पडतोय - अगदी पुर येतील इतका. (आठवतंय, नाशिकला या वर्षी फ़क्त दोन दिवसांच्या पावसानी महापुर आलेला?) आणि हिवाळ्यामधे तापमानदर्शक पाऱ्याचा तळ गाठतोय.. अगदी ५-६ डि.से. पर्यंत घसरण होतेय, काही ठिकाणी तर त्याहुनही खाली.
हे असं आधीपासुन होतंय आणि आत्ता ते प्रकर्षानी जाणवतंय, की आत्ता-आत्तापासुनच हा प्रकार सुरु झालाय?
पण ठिक आहे, अजुनही खुप काही अवघड स्थिती नाहीये की ज्यामुळे समस्त सजीव सृष्टीला धोका निर्माण होईल.. तोपर्यंत ’एन्जॉय’!!!!
पण आजच्या क्षणात या थंडीची मजा लुटूया.. मस्त गरमागरम चहा ड्रिंकुन!
मी पण ड्रिंकतो चहा, तुम्ही पण ड्रिंका...
Sunday, 15. July 2007, 08:08:20
गारवा, मिलिंद इंगळे, मराठी गाणे
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्याची वाट बघ,
बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?
Showing posts 1 -
3 of 10.