Monday, 12. October 2009, 17:51:11
मराठी, आवडलेलं, संदिप खरे, कविता
मी संदिप खरेंचा फॅन आहे. त्यांच्या बऱ्याच कविता मला आवडतात. त्यांतलीच एक "मोर्चा".
आयुष्यात कोणतीच गोष्ट न करणारा, काय योग्य काय अयोग्य, काय चांगले काय वाईट हे काहीही न बघणारा आणि त्यावर कोणतेच भाष्य, कृती न करणारा माणुस या कवितेत रेखाटला गेलाय. या कवितेत वापरलेली उदाहरणं, उपमा इतक्या चपखल आहेत की तोंडातुन "अरे व्वा!" बाहेर पडल्याशिवाय राहत नाही.
मी मोर्चा नेला नाही
मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा
कधी नोंदवलेला नाही ॥धृ॥
भोवताली संगर चाले
तो विस्फारुन बघतांना
कोणी पोटातुन चिडतांना
कोणी रक्ताळुन लढतांना
मी दगड होऊनी थिजलो
रस्त्याच्या बाजुस जेव्हा
तो मारायाला देखील
मज कुणी उचलले नाही ॥१॥
नेमस्त झाड मी आहे
मुळं फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो
थंडीत झाडली पाने
पण पोटातुन कुठलीही
खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही
कधी गरुड बैसला नाही ॥२॥
धुतलेला एकच सदरा
तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजुन रुळते
अदृष्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो
मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या
कधी दंगा केला नाही ॥३॥
मज जन्म फळाचा मिळता
मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी
तर भेंडी झालो असतो
मज चिरता-चिरता कोणी
रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही
आंबा ही झालो नाही ॥४॥
Sunday, 26. April 2009, 05:36:39
चित्रपट, मराठी, अभिमान
काल मी ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ बघितला. आई-बाबांना नेहेमीच्या दगदगीतुन थोडी विश्रांती आणि विरंगुळा मिळावा म्हणुन त्यांना सुद्धा घेऊन गेलो होतो मुद्दामच. आम्हाला तिघांनाही आवडला हा चित्रपट. मान्य आहे, जरा उशिराच बघितला आहे आम्ही हा चित्रपट, पण पाहिला!!
खरंच छान बनलाय हा. चित्रपटातले संवाद तर अफलातुन आहेतच, पण सगळ्यांचीच कामं सुद्धा सुरेख झाली आहेत. यातले बरेचसे क्षण तर मनाला अगदी भावतात.
सचिन खेडकरचा "लाज वाटते मराठी म्हणुन जन्मल्याची... लाज वाटते" हा संवाद.. तिथले राष्ट्रपुरुषांचे पुतळे..
शिवाजी महाराजांसमोर सचिन खेडकर ’परप्रांतियांनी कसे टपऱ्या, हॉटेलं, ऑफिसेस, मोठी पदं असे सगळेच व्यवसाय हडप केले आहेत’ याचं गाऱ्हाणं मांडतो, आणि त्यावर महाराजांचा "हे सगळं करायला तुम्हाला कोणी रोखलं होतं?" असा खडा सवाल..
बि.एम.सी.मध्ये जाऊन सचिन तिथल्या अधिकाऱ्यांना झाडतो तो प्रसंग..
आणि तो पोवाडा!! पोवाडा गाताना भरत जाधवच्या डोळ्यांत झळकणारं महाराजांचं कौतुक आणि तो पोवाडा ऐकतांना महाराजांच्या चेहऱ्यावर पसरलेलं स्मित आणि अभिमान!!
सगळंच छान आहे. मराठी माणसांना खरंच जागं करणारा चित्रपट आहे हा!! म्हणजे, उगाचच परप्रांतियांच्या नांवानं बोटं मोडत बसण्यापेक्षा काय करायला पाहिजे ते या चित्रपटात कळतं.
हा!! पण एक आहे, हा चित्रपट टॉकिजमध्येच जाऊन बघण्यात मजा आहे. जर तुम्ही अजुन पण पाहिला नसेल तर, सिडी-डिव्हीडी येण्याची वाट बघु नका!! तडक चित्रपटगृहात जा आणि बघा..! याचे काही प्रोमो बघायचे असतील तर यु-ट्युबवर इथं, इथं आणि इथं आहेत.
Tuesday, 14. October 2008, 04:23:09
गोष्टी, गप्पा, उनाड, मजा
...

राम-राम!!
आज मला दोन वेगवेगळ्या टॉपिक्सवर बोलायचं होतं (म्हणजे लिहायचं होतं हो! समजुन घ्या तेवढं.) म्हणुन मग हि दुसरी पोस्टपण राईटतोय.

गॉटलंच असेल तुम्हाला मला कशाबद्दल राईटायचंय ते... (हो! टायटलमध्ये लिहिलं आहेच तसं, पण ते कसं ते इथं लिहितोय.) चला, तुमचा जास्ती वेळ वेस्टत नाही, डायरेक्ट मुद्यालाच हात घालतो.
तसं माझ्या मित्र-मंडळींमध्ये ही असली भाषा वापरायला (खरंतर ’युझायला’) सुरुवात झाली आमच्या टि.वाय.मध्ये (किंवा कदाचित एस.वाय.मध्ये, माझी मेमरी फक्त १२८ एम.बी.ची होती तेव्हा. आणि काही वायरसेस मुळं काही माहिती खराब झालेली असण्याची शक्यता बिलकुल नाकारता येत नाही.). माझा मित्र सचिन या भाषेचा निर्माता.

मला आठवतय, आम्ही मॅथ्सच्या क्लासला बसलेलो असायचो, आणि प्रत्येक गणित समजावुन सांगुन झालं की दवांगे सर विचारायचे "गॉट इट ऑर नॉट?"

आणि मग सच्या आम्हाला विचारायचा, "कारे, गॉटले का तुला?"

तेव्हापासुन आम्ही मजा म्हणुन ती भाषा वापरायला सुरुवात केली. आणि आमच्या कळत-नकळत आम्हाला त्याची इतकी सवय पडली की आम्ही ती आता अशी राजरोसपणे युझतो. (हुश्श! किती कंट्रोल ठेवला होता मी हा पॅराग्राफ लिहीतांना... आता मात्र ग्लॉबल मराठीतच लिहितो.)
तर, अशा प्रकारे मराठी भाषेचं आणखी एक वर्जन (version) निघालं!!! तुम्हीपण बोलुन बघा असं, खरचं खुप मजा वाटते. तिसऱ्याला काही कळालं नाही की मग तो आपल्याला ’आस्क’तो, आणि मग आपण त्याचा गोंधळलेला चेहरा ऎंजॉय करायचा! आत्त्ता पण तुम्ही ही पोस्ट रिडताना तुमचा होणारा गोंधळ कसा असेल याची कल्पना करुनच मला लाफायला होतंय.

सही ना! मग तुम्हाला हे सगळं गॉटलं असेल, आणि आवडलं असेल तर तुम्हीपण ही भाषा युझायला सुरुवात करा!
बेस्ट ऑफ लख्ख लक!!
Showing posts 1 -
3 of 24.