८१
Sunday, March 22, 2009 7:19:53 AM
आत्ताच टि.व्ही.वर बातमी पाहिली, इंटरनेटवर - टाईम्स ऑफ इंडीयाच्या साईटवर सुद्धा वाचली, "बि.सी.सी.आय. चा निर्णय.. आय.पी.एल. भारताबाहेर होणार...!"
बातमी पाहिली आणि माझ्या मनात हाच प्रश्न आला. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळं आय.पी.एल. पुढं ढकलली गेली होती, सुरक्षेच्या कारणास्तव. ते योग्यच होते.
त्यानंतर बि.सी.सी.आय.नं चंगच बांधलेला आहे, आय.पी.एल. स्पर्धा भरवण्याचा. इतका वेळ मी या चंगाकडं "खेळानी दहशतीवर मिळवलेला विजय" अशा कौतुकानं बघत होतो... बि.सी.सी.आय.च्या जिद्दी कडं बघत होतो.. पण ही बातमी वाचल्यावर मात्र माझं पित्तंच खवळलं..
या बातमीचा असा अर्थ होतो की, बि.सी.सी.आय.ला देशाच्या सुरक्षा आणि सन्मानापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा लाखमोलाची वाटतेय. देशाच्या सुरक्षेचं काहीही होवो, आम्ही ही स्पर्धा घेणारच!! भारतात नाही तर भारताबाहेर!!!!
का पण हा हट्ट? मान्य आहे, खेळावर आपण निर्बंध नाही लादु शकत, लादु पण नयेत. पण या प्रकरणात नुसताच खेळ नाहीये. आय.पी.एल. स्पर्धेनं क्रिकेटचं खुप काही भलं होतंय असं तर काही दिसत नाहीये.. इथं दिसतंय ते फक्त पैसा मिळवण्यासाठी चाललेलं एक नाटक.. आय.पी.एल.नं मागच्या वर्षी बि.सी.सी.आय.ला अमाप पैसा मिळवुन दिलाय. आणि तसाच पुन्हा एकदा मिळवण्यात बि.सी.सी.आय.ला स्वारस्य आहे.
खरं तर एवढं सगळं रामायण-महाभारत घडत असतांना, आय.पी.एल. स्पर्धा रद्द करणं उचीत वाटलं असतं. एखाद्या वर्षी ही स्पर्धा नाही झाली तरी काहीही बिघडलं नसतं.. पण इथं होऊ शकत नाहीये म्हणुन ती देशाबाहेर घेणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? खासकरुन जेव्हा सरकारनं (दोन्ही - केंद्र आणि राज्य सरकारे) सुरक्षेचं कारण दिलंय तेव्हा??
आधीच कित्येक देशांचे खेळाडु या स्पर्धेत भाग घ्यायला एवढे उत्सुक नाहीयेत. तरीही आपलं घोडं पुढं दामटणं चालु आहेच!!
इंग्लंड मध्ये असं काही झालं असतं तर त्यांनी त्यांची ई.पी.एल. अशी देशाबाहेर खेळवली असती??
मला मान्य आहे, इंग्लंडची आणि आपली तुलना करु नये, त्यांना एकाच तराजुमध्ये तोलु नये..
पण इ.पी.एल. आणि आय.पी.एल. आयोजीत करणाऱ्या संस्थांना तर आपण तोलु शकतो ना?
प्रश्न मानसिकतेचा आहे..

Anonymous # Saturday, March 28, 2009 2:44:07 PM