दंगा-मस्ती - क्रिकेटची...
Wednesday, October 7, 2009 2:19:32 AM
कोणाचा तरी प्रोजेक्ट रिपोर्ट होता, ती आमची बॅट. आणि कागदाचा बोळा म्हणजे आमचा बॉल.. आणि आमचं क्रिकेट सुरु!! बऱ्याच दिवसांनी असं ’इन-डोअर क्रिकेट’ खेळलो! दंगामस्ती करत खेळलो आणि मी, भरत आणि धन्या - आम्ही तिघंही फ्लॅशबॅकमध्ये गेलो. आम्ही जेव्हा बि.सी.एस.च्या तिसऱ्या वर्षाला होतो, तेव्हा टिळे सरांच्या क्लासवर दुपारी असंच क्रिकेट खेळायचो. बऱ्याचदा कॉलेजला दांडी मारलेली असायची. तिथुन निघुन थेट सरांच्या क्लासवरच टपकायचो आम्ही. मग कोणाचं तरी ’रायटींग पॅड’ आमचं बॅट बनायचं आणि सरांची बोर्ड पुसायची कापडं आमचा चेंडु तयार करायचे. सरांनी क्लास सांभाळायला ठेवलेला ललितसुद्धा असायचा आमच्या सोबत. नुसता धांगडधींगा चालायचा आमचा.
क्लासमध्ये प्रोग्रामींगची प्रॅक्टीस करण्यासाठी एक स्वतंत्र लॅब होती. तेच आमचं मैदान असायचं. कधी कधी काही पोरी तिथं प्रोग्राम करत बसलेल्या असायच्या.. पण आम्हाला कसलीच पर्वा नसायची.. कोणी तक्रार करेल वगैरे काही भितीच नाही ना!
सर यायच्या वेळी मात्र आम्ही सगळं परत जागच्या-जागी ठेवुन निमुटपणे प्रोग्राम करतोय असं दाखवायचो. टिळे सरांना घाबरायचो आम्ही सगळेच.
एकदा काय झालं, आम्ही असंच क्रिकेट खेळत होतो. कोण बॅटींग करत होतं आठवत नाही आता. एक मुलगी लॅब मध्ये प्रोग्राम करत बसली होती. शॉट मारतांना बॅट्समनच्या हातुन पॅड सटकलाच, आणि भिरभिरत गेला थेट ती पोरगी बसलेली त्या कॉम्प्युटरवरच! मुलगीतर वाचलीच थोडक्यात, कारण अन्यथा डोकं फुटलंच असतं तीचं, पण पॅड नेमके मॉनिटरच्या कोपऱ्यावर बसले. जरा अजुन अलिकडे बसले असते तर स्क्रीनचा नक्कीच चक्काचूर झाला असता! आणि मग हे क्रिकेट आम्हाला चांगलंच महागात पडलं असतं... पण वाचलो!
अगदी इंटरनल परिक्षेच्यावेळी सुद्धा आम्ही हे क्रिकेटायन सोडले नाही. पेपरच्या आधी आम्ही सगळे क्लासवर जमायचो. बाकीचे लोक तिथं अभ्यास करत बसलेले असायचे आणि आम्ही मात्र क्रिकेट खेळत असायचो. खुप एन्जॉय केलंय आम्ही हे असं ’इन-डोअर’ क्रिकेट.
तसं आम्ही ’आऊट-डोअर’ क्रिकेट सुद्धा भरपुर खेळलो आहोत, आणि त्याचे सुद्धा भरपुर मजेशीर किस्से आहेत.. पण ते नंतर सांगेन, पण नक्की सांगेन.

How to use Quote function: